Wednesday, August 26, 2009

हाताचे पाय करून मिळविली डॉक्‍टरेट

पुण्याच्या रामवाडीत राहणाऱ्या रिक्षाचालकाचा दोन्ही पायांनी अपंग मुलगा भाऊसाहेब बोत्रे याने केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर डॉक्‍टरेट मिळवली आहे. 'डिझाईन अँड डेव्हलपमेन्ट ऑफ एम्बेडेड इलेक्‍ट्रॉनिक नोज अँड इट्‌स ऍप्लिकेशन्स' हा त्यांच्या पीएच.डी.च्या संशोधनाचा विषय होता. पुणे विद्यापीठाने त्याला ३० मार्च २००९ ला पीएचडीचा निकाल सुपूर्द केला. दोन वर्षांपूर्वी बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाऊसाहेबने त्याच्या संशोधनाची मांडणी केली होती.


भाऊसाहेबचे दोन्ही पाय लहानपणीच पोलिओमुळे अधू झाले. मात्र त्यांचे जगणे जिद्द आणि कष्टाची परिसीमा गाठणारे ठरले. कुबड्यांवर चालता येत नव्हते म्हणून दोन्ही हातांचे पाय बनवत त्याने स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात झोकून दिले. भाऊसाहेबने पुणे विद्यापीठात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत "एमएस्सी' पूर्ण केले. त्यानंतर डॉ. दमयंती घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली "पीएच.डी'साठी संशोधन सुरू केले. "आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क' आणि "गॅस सेन्सर ऍरे'च्या आधारे "इलेक्‍ट्रॉनिक नोज' तयार करून अन्नपदार्थांचा ताजेपणा, गुणवत्ता तपासणारे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न भाऊसाहेबने केला आहे. या संशोधनातून संगणकाला कोणत्याही अन्नपदार्थाचे गंध किंवा वास ओळखण्याचे सामर्थ्य येईल, अशी आशा त्याला आहे. खरगपूर आणि बंगळूर येथे "आयआयटी'मध्ये झालेल्या कार्यशाळांत भाऊने प्रबंधवाचन केले आहे. केंद्रीय विज्ञान संशोधन केंद्राची सिनिअर रिसर्च फेलोशिप त्याला मिळाली आहे. "फिजिक्‍स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ऑफ सेन्सर्स'च्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेत त्याच्या सादरीकरणाला पहिला, तर बंगळूरच्या स्पर्धेत कृत्रिम गंधसंवेदना पद्धतीबाबतच्या प्रबंधाला दुसरा पुरस्कार मिळाला होता. बोस्टन परिषदेत सहभागानंतर त्याचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. देशाच्या उपयोगासाठी या विषयात आणखी संशोधन करण्याची इच्छा भाऊसाहेब बोत्रे यांना आहे.



आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतोय। अश्या समाजत भाऊने "किती लाख" मोलाचा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय, नाही का?

भाऊ माझा चांगला मित्र आहे आणि याचा मला फार अभिमान आहे

(
मराठी पाऊल पड़ते पुढे)

No comments:

Post a Comment